कन्नड, (प्रतिनिधी): आदर्शकडे वाटचाल करणाऱ्या सारोळा गावास समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नियुक्त पथकाने भेट देऊन संपूर्ण गावाची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी केली. या पथकात गटविकास अधिकारी (पं. समिती देवळा जि. नाशिक), प्रशांत पवार, प्रकल्प अधिकारी ( पं. स.) देवळा श्रीकांत पवार, वैद्यकीय अधिकारी (देवळा), संतोषकुमार आडे यांचा समावेश होता.
तपासणीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य उपकेंद्र, आपले सरकार सेवा केंद्र तसेच गावामध्ये राबविण्यात आलेल्या विविध शासकीय योजना, लोकसहभागातून झालेले उपक्रम, स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा व्यवस्था, कर वसुली, डिजिटल सेवा, महिला बचत गट, मनरेगा कामे, वृक्षारोपण, सामाजिक उपक्रम आदी बाबींची सखोल तपासणी करण्यात आली.
या तपासणीमध्ये १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील विकास कामे, प्रशासकीय नोंदी, योजनांची अंमलबजावणी, लाभार्थी माहिती, आर्थिक व्यवस्थापन, गावस्तरीय सुविधा आणि नागरिक सहभाग यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
पथकाने विविध विभागांच्या नोंदी तपासून प्रत्यक्ष स्थळ भेटीद्वारे कामांची पडताळणी केली. गावातील स्वच्छता, हरित उपक्रम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळांमधील शैक्षणिक वातावरण, अंगणवाडीतील पोषण सेवा, आरोग्य सुविधांची उपलब्धता तसेच ग्रामपंचायतीचे सुशासन व डिजिटल कामकाज यावर विशेष भर देण्यात आला. गावातील नागरिकांचा लोकसहभाग इत्यादी पाहणी करण्यात आली.
यावेळी विस्तार अधिकारी (कन्नड) संतोष दारकुंडे, सरपंच भागवत बिघोत, जगन जगले, तंटामुक्ती अध्यक्ष रत्नाकर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी अशोक काळे, महसूल अधिकारी राजू नवले, संगणक परिचालक सुनील ढमाले, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, आरोग्यसेविका ज्योती काळे, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस, आशा कार्यकर्त्या, बचत गट प्रतिनिधींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













